ऐनपूर (ता. रावेर) : ऐनपूर येथील स्वस्त धान्य दुकान क्र. ६४ मध्ये दुकानदार शासकीय नियम धाब्यावर बसवून लाभार्थ्यांना आपल्या मर्जीप्रमाणे धान्य वाटप करत असल्याची तक्रार पुढे आली आहे. यामुळे गरीब व रोजंदारीवर उपजीविका करणारे लाभार्थी महिन्याच्या धान्य वाटपाच्या प्रतीक्षेत चांगलेच हैराण झाले आहेत.
शासकीय नियमांकडे दुर्लक्ष
शासकीय नियमानुसार रास्त धान्य दुकान हे दररोज सकाळ-संध्याकाळ अशा दोन शिफ्टमध्ये खुले असावे. तसेच बायोमेट्रिक पडताळणी करूनच धान्य वाटप करणे बंधनकारक आहे. मात्र, दुकानदार हे नियम पाळत नसून, स्वतःच्या सोयीनुसार शेवटच्या दिवशी सर्व लाभार्थ्यांना बोलावून धान्य देतात. यामुळे वेळेवर येऊ न शकणाऱ्या अनेकांना धान्य मिळण्यात अडचणी येत आहेत.
माहिती फलकांचा अभाव दुकानाच्या दर्शनी भागावर कोणतेही शासकीय फलक, कार्डधारकांची यादी, धान्याचे प्रमाण वा दक्षता समितीची माहिती लावण्यात आलेली नाही. त्यामुळे लाभार्थी अनभिज्ञ राहून दुकानदाराच्या सांगण्याप्रमाणे धान्य घेऊन जातात.सप्टेंबरचे वाटप अद्याप सुरूच नाही सप्टेंबर महिन्याची २० तारीख उलटूनही ऐनपूर येथील रेशन धान्य वाटप सुरू झालेले नाही. पुरवठा विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याची चर्चा लाभार्थ्यांमध्ये सुरू आहे.लाभार्थ्यांची मागणी लाभार्थ्यांनी पुरवठा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन वास्तव स्थिती पाहावी आणि मनमानी करणाऱ्या दुकानदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.





