पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित पंढरपूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते चंद्रकांत प्रभाकर बागल (वय ६३) यांच्याकडे रिव्हॉल्वर आणि काडतुसे आढळल्याने पुणे विमानतळावर शुक्रवारी रात्री खळबळ उडाली. सुरक्षा तपासणीदरम्यान त्यांच्या बॅगेत भारतीय बनावटीचा रिव्हॉल्वर, पाच जिवंत काडतुसे आणि एक रिकामे काडतूस आढळून आले.
सीआयएसएफ आणि विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत बागल यांना ताब्यात घेतलं आणि विमाननगर पोलिसांकडे सुपूर्द केलं. भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
चौकशीत समोर आलं की, बागल यांच्याकडे शस्त्राचा परवाना असला तरी तो फक्त महाराष्ट्रापुरता वैध आहे. वाराणसीला प्रवास करताना आवश्यक परवानगी न घेतल्याने नियमभंग झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. त्यांचं शस्त्र जप्त करण्यात आलं असून चौकशीसाठी नोटीस दिल्यानंतर पुढील प्रवासास परवानगी देण्यात आली.
चंद्रकांत बागल हे व्यवसायाने सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी २०१४ साली पंढरपूर विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती. त्या पराभवानंतर ते सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. यापूर्वी ते सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्यही राहिलेले आहेत.





