जामनेर – शहरातील हाजी बशीर नगर येथील ओपन स्पेस भूखंडावर काही नागरिक आपली जनावरे मोकाट सोडून देत असल्याचे दिसून येते आहे. ही जनावरे उद्यान परिसरात मुक्तपणे फिरून तेथे मल-मूत्र करतात. यामुळे परिसरात अस्वच्छता पसरत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आजारी जनावर येथे मृतावस्थेत पडले असून त्याचा तीव्र दुर्गंधीने परिसर त्रस्त झाला आहे. उद्यानात फिरायला येणाऱ्या महिला, लहान मुले तसेच विद्यार्थ्यांना या दुर्गंधीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांचे आरोप
नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात फिरत आहेत.
सार्वजनिक उद्यान, रस्ते व खुल्या जागेत जनावरे मुक्तपणे फिरून अस्वच्छता करत आहे
मृत जनावर हटविण्यास व स्वच्छता करण्यास नगरपालिका प्रशासनाने आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही.
नागरिकांच्या आरोग्याकडे व सुरक्षिततेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
नागरिकांची मागणी
नागरिकांनी नगरपरिषदेचे लक्ष वेधत तातडीने मृत जनावर हटवून परिसराची स्वच्छता करण्यात यावी, तसेच मोकाट जनावरे सोडणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
आरोग्याचा धोका वाढतोय
सार्वजनिक ठिकाणी मोकाट जनावरांच्या वावरामुळे अस्वच्छता तर होतेच, परंतु विविध संसर्गजन्य आजारांचा धोका देखील वाढतो. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरू शकते, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.





