जळगाव – शहरात उघडपणे भडकाऊ व बेकायदेशीर बॅनर लावण्यात आले होते. दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होऊ शकणाऱ्या या बॅनरांवर दबाव टाकून ते हटविण्यात आले. मात्र प्रत्यक्ष दोषींवर अद्यापही कोणतीही गुन्हेगारी कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीतील दुहेरी मापदंड उघडकीस येत असल्याचा आरोप एकता संघटनेने केला आहे.
कानपूरमध्ये कडक कारवाई – मग जळगावात मौन का?
उत्तर प्रदेशातील कानपूर येथे केवळ “आय लव्ह मुहम्मद” असे लिहिलेल्या पोस्टरवर तब्बल २५ युवकांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 196 (देशद्रोहासारखे अपराध), 299 (दंगा/शांतिभंग) यांसह कठोर कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले. परंतु जळगावात प्रत्यक्ष भडकाऊ मजकूर असलेले बॅनर लावले गेले तरी गुन्हा दाखल न होणे हे प्रशासनाचे पक्षपाती धोरण असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
एकता संघटनेच्या मागण्या
१) दोषींवर BNS कलम 196, 299, 335, 336, 337, 338 अंतर्गत कठोर कारवाई करावी.
२) संबंधितांना अटक करून तुरुंगात पाठवावे.
३) भविष्यात भडकाऊ बॅनर/पोस्टर लावण्यावर पूर्ण बंदी घालावी.
४) प्रशासनाने कारवाई न केल्यास हा समाजाशी अन्याय मानला जाईल.
आमदार व एस.डी.पी.ओ. यांना तक्रार
एकता संघटनेचे समन्वयक फारूक शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जळगावचे आमदार राजू मामा भोळे आणि विभागीय एस.डी.पी.ओ. नितीन गनापुरे यांना लेखी तक्रार दिली.
आमदार भोळे यांनी मुस्लिम समाजापुढे भडकाऊ मजकुराबद्दल दिलगिरी व्यक्त करत सर्व समाजांनी शांतता राखावी, असे आवाहन केले. तर एस.डी.पी.ओ. गनापुरे यांनी खोडसाळ कृत्य करणाऱ्यांना इशारा देऊन तक्रारीवर कारवाईचे आश्वासन दिले.
उपस्थिती
या वेळी फारूक शेख, नदीम मलिक, हाफिज रहीम पटेल, मौलाना उमेर नासिर, अनीश शाह, मजहर खान, अन्वर सिकलगर, आरिफ देशमुख, सैयद इरफान अली, कासिम उमर, समीर शेख, शाहरुख शेख, समीर खान, नजमुद्दीन शेख, इमरान शेख, समीर बेग मिर्झा, चिरागुद्दीन शेख, जुबेर खान, शाहिद खान, रज्जाक पटेल, आसिफ खान, हाफिज इमरान, मोहम्मद इमरान, सोहेल शेख, अनीस बेग, फिरोज शेख आदी उपस्थित होते.





