जळगाव : राज्यात परतीच्या पावसाने जोर धरला असून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. जळगावसह धाराशीव, बीड, जालना, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नद्या-नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरले. पावसामुळे मराठवाड्यातील चौघांचा आणि जळगाव जिल्ह्यातील एक, अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा महसूल मंडळात अवघ्या आठ तासांत तब्बल १४७ मिमी पाऊस झाला. त्यामुळे घरे-दुकानांत पाणी शिरले असून मोठे नुकसान झाले. त्याचवेळी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण केली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात सलग दोन कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पावसाचा जोर वाढला आहे. १ जून ते २२ सप्टेंबरपर्यंत राज्यात साधारण १२ टक्के अधिक पाऊस झाला असून, सरासरी ९५३ मिमीच्या तुलनेत एकूण पावसाने हजार मिमीचा टप्पा ओलांडला आहे.
२४ तासांत जळगावच्या पाचोऱ्यात १४३ मिमी, जेऊर येथे १०५ मिमी, माढा येथे १२० मिमी, पैठण येथे तब्बल २०० मिमी आणि धाराशीवमधील भूम येथे १६७ मिमी पावसाची नोंद झाली.
पूरस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफ व एसडीआरएफची पथके धाराशीव, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांत तैनात करण्यात आली आहेत. परांडा तालुक्यातील लाची गावात अडकलेल्या नागरिकांना एअरलिफ्ट करण्यात आले. गिरणा, अंजनीसह इतर नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.





