यावल – यावल तालुक्यातील चुंचाळे गावात भरवस्तीत पोलीस पाटील यांच्या घरासमोर बखळ जागेत मृतावस्थेतील एक दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना स्त्री अपत्य जन्माची लपवणूक करण्याच्या उद्देशाने घडवली असावी, अशी चर्चा गावात सुरू आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २१ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता गावातील पोलीस पाटील गणेश पाटील आपल्या शेतात जात असताना त्यांच्या घराजवळील मोकळ्या जागेत कुत्री काहीतरी चाटत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांना हाकलून दिल्यानंतर तिथे एक दिवसाचे स्त्री जातीचे मृत अर्भक आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील गणेश पाटील यांनी यावल पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात महिलेविरुद्ध अर्भक उघड्यावर टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार करत आहेत.
या प्रकारामुळे गावात मोठी संतापाची लाट पसरली असून, अशा अमानुष कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.





