मुंबई : राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होणार असून, ८ ते १४ ऑक्टोबर दरम्यान हरकती आणि सूचना दाखल करता येतील. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने निवडणूक विभागाने तयारीला गती दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून, त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदारयादीच या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीनिहाय प्रारूप यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होईल. या यादीवर हरकती नोंदवण्याची मुदत १४ ऑक्टोबरपर्यंत आहे. त्यानंतर २७ ऑक्टोबर २०२५ रोजी अंतिम मतदारयादी व मतदान केंद्रनिहाय यादी जाहीर केली जाईल.
मतदारयादी तयार करताना विधानसभेच्या यादीप्रमाणेच मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. मात्र या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे किंवा दुरुस्ती करणे अशी प्रक्रिया केली जात नाही. हरकतींच्या आधारे केवळ विभाजनाच्या वेळी झालेल्या तांत्रिक चुका दुरुस्त केल्या जातात. उदाहरणार्थ, मतदाराचा निवडणूक विभाग चुकीचा लागणे किंवा विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नसणे इत्यादी.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात महाराष्ट्र निवडणूक आयोगाला आदेश दिले होते की, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पार पाडाव्यात. तसेच प्रभागांचे सीमांकन ३१ ऑक्टोबर २०२५ पूर्वी पूर्ण करणे आणि निवडणुका घेण्यासाठी आवश्यक मशिन्स व कर्मचारी संख्या राज्याच्या मुख्य सचिवांना त्वरित कळविण्याचे निर्देशही दिले आहेत.





