मुंबई : सहा कोटी रुपयांचा हुंडा आणावा म्हणून सासरच्या मंडळींनी एका विवाहितेचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केला. अत्याचार इतका वाढला की, मारहाणीमुळे पीडितेचा गर्भपात झाला. या प्रकरणी माहीम पोलिसांनी पीडितेचा पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
डिसेंबर २०२४ मध्ये माहीम येथील लाकडाच्या व्यापाऱ्याशी पीडितेचे लग्न झाले. लग्नापूर्वी सासरच्या मंडळींनी हुंड्यात २१ लाख रुपये रोख आणि बीएमडब्ल्यू कार अशी मागणी केली होती. मात्र, वडिलांनी ११ लाख रुपये, १६५ तोळे सोने, दोन किलो चांदी व एक कार दिली. शिवाय इस्लाम जिमखाना येथे तब्बल तीन कोटी रुपये खर्च करून लग्न सोहळा थाटात पार पडला.
लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत होते. मात्र नंतर पती, सासू, सासरे आणि घटस्फोटित नणंद यांनी हुंड्यासाठी पीडितेचा छळ सुरू केला. पतीच्या व्यवसायासाठी माहेरून सहा कोटी रुपये आणावेत, असा दबाव टाकण्यात आला. त्यासाठी दररोज मारहाण, शिवीगाळ आणि टोमणे सुरू झाले.
दरम्यान, पीडिता गर्भवती राहिली. त्यामुळे छळ थांबेल, अशी अपेक्षा होती. पण उलट तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव आणला गेला. तिने नकार दिल्यावर पतीने अमानुष मारहाण करत पोटात लाथा घातल्या आणि घराबाहेर काढले. या मारहाणीमुळेच गर्भपात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या अत्याचाराला कंटाळून पीडितेच्या माहेरच्या मंडळींनी पोलिसांत धाव घेतली असून, चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





