ठाणे : ठाण्यातील शतकपूर्ती परंपरेचा स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांनी बाजी मारली. माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पॅनलने नऊपैकी पाच जागा जिंकून बहुमत मिळवले.
यंदाची निवडणूक राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्वाची मानली जात होती. कारण एका बाजूला शिंदे गटाचे पॅनल होते, तर दुसऱ्या बाजूला भाजप, ठाकरे गट आणि मनसे या तिन्ही पक्षांची अपूर्व युती. परिणामी ही लढत केवळ क्लबपुरती न राहता राजकीय प्रतिष्ठेची झाली.
अखेरीस शिंदे गटाच्या पॅनलने विकास रेपाळे, विलास जोशी, ॲड. कैलास देवल, श्रावण तावडे आणि किरण साळगावकर यांना विजयी करून पाच जागांवर झेंडा फडकवला. तर मावळत्या कार्यकारिणीतील डॉ. राजेश मढवी, दिलीप धुमाळ, अतुल फणसे आणि डॉ. योगेश महाजन यांनी आपली जागा कायम राखली.
गेल्या महिन्यात झालेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीतही ठाकरे बंधूंच्या युतीला पराभव पत्करावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर स्पोर्टिंग क्लब निवडणुकीतील हा निकाल ठाकरे–भाजप–मनसे युतीसाठी आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.





