मुंबई : राज्यातील अतिवृष्टी आणि पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रलंबित २२०० कोटी रुपयांची मदत वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मात्र, ओला दुष्काळ जाहीर करणे किंवा शेतकरी कर्जमाफीबाबतचा निर्णय सरकार योग्य वेळी घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या वतीने मराठवाड्यात मदतीचे ट्रक रवाना केल्यानंतर शिंदे माध्यमांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, मराठवाड्यातील अनेक हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून काही ठिकाणी माती खरवडून गेली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शिंदे म्हणाले, “पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफ आणि सैन्य दलाची मदत घेण्यात आली आहे. मराठवाडा–विदर्भात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. घरांची पडझड, जनावरांचे मृत्यू आणि शेतीचे नुकसान झाले असून आपत्तीग्रस्तांना मदत तत्काळ देण्यात येईल.”
त्यांनी पुढे सांगितले की, वैद्यकीय कक्ष स्थापन करून औषधे व डॉक्टरांची तातडीने व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय भांडी, कपडे, ब्लँकेट यांसारख्या गरजेच्या वस्तूंचे ५०–६० ट्रक आपत्तीग्रस्त भागात रवाना करण्यात आले आहेत.
दरम्यान, पूरस्थितीनंतर साथीचे रोग पसरू नयेत म्हणून आरोग्यमंत्री स्वतः जिल्ह्यांचा आढावा घेतील, अशी माहितीही शिंदे यांनी दिली.





