नवी दिल्ली : दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेची मागणी वाढणार असतानाच केंद्र सरकारने ऑक्टोबर 2025 साठीचा देशांतर्गत साखर विक्री कोटा 24 लाख मेट्रिक टनांवर निश्चित केला आहे. हा कोटा गेल्या वर्षाच्या तुलनेत 1.25 लाख मेट्रिक टनांनी कमी आहे. यामुळे बाजारातील उपलब्धता मर्यादित होऊन दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गतवर्षी 2024 मध्ये 25.25 लाख मेट्रिक टनांचा कोटा देण्यात आला होता. सध्या साखरेचा घाऊक दर (जीएसटी वगळता) 3,850 ते 3,900 रुपये प्रतिक्विंटल इतका आहे.
दरम्यान, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केंद्र सरकारकडे साखरेच्या किमान विक्री दरात 25% वाढ करण्याची मागणी केली आहे. महासंघाने मंत्रालयाचे सचिव संजीव चोप्रा यांना पाठविलेल्या पत्रात, आगामी हंगामासाठी किमान दर 3,100 वरून 3,900 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत नेण्याचा प्रस्ताव दिला आहे.
महासंघाच्या मते, या निर्णयामुळे ग्राहकांवर अतिरिक्त भार पडणार नाही; कारण बाजारभाव आधीच या पातळीवर आहेत. उलट या दराला कायदेशीर मान्यता मिळाल्याने उद्योगात स्थैर्य निर्माण होईल.
तज्ज्ञांच्या मते, कोटा कमी होणे आणि सणासुदीची वाढती मागणी लक्षात घेता साखरेच्या दरात आणखी 50 ते 100 रुपये प्रतिक्विंटल वाढ होऊ शकते.





