पाचोरा : अलीकडील पुराच्या कहरानंतर पाचोरा नगरपालिकेने मोठा निर्णय घेत बुधवारी (२४ सप्टेंबर) सकाळपासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. मुख्याधिकारी तथा प्रशासक मंगेश देवरे यांच्या नेतृत्वाखाली बसस्टॅन्ड रोडवरील नाले व गटारींवर झालेली अतिक्रमणे हटवून मार्ग मोकळे करण्यात आले.
ढगफुटीसदृश पावसानंतर बसस्टॅन्ड परिसर, जनता वसाहत, नागसेन नगर, छत्रपती शिवाजी नगर यांसह अनेक भागात पाणी साचून मोठे नुकसान झाले होते. चौकशीत नाल्यांवर टाकलेले सिमेंटचे ढापे व त्यावर उभारलेली दुकाने ही पाण्याच्या तुंबण्याची प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट झाले.
यावर प्रशासनाने तातडीने कारवाई करून जेसीबीच्या सहाय्याने नाल्यावरील दुकाने व ढापे हटवले. यापूर्वी सर्व दुकानदारांना नोटिसा देण्यात आल्या होत्या, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली.
मुख्याधिकारी देवरे यांनी सांगितले की, “नागरिकांच्या सुरक्षेला बाधा आणणारे कोणतेही अतिक्रमण सहन केले जाणार नाही. बसस्टॅन्ड परिसराप्रमाणेच शहरातील इतर भागातील अतिक्रमणही टप्प्याटप्प्याने हटवले जाईल.”
या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, पुन्हा अशा आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी ही मोहीम आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.





