जळगाव : फेसबुकवर ओळख करून विवाहितेला लग्नाचे अमिष दाखवत चार वर्षांपासून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी नितीन कमलाकर सपकाळे, त्याची पत्नी व आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमधील एका विवाहित महिलेची २०१७ मध्ये सपकाळे याच्यासोबत ओळख झाली. सातत्याने संवाद झाल्यामुळे त्यांच्यातील मैत्री प्रेमात बदलली. महिलेचा तिच्या पतीसोबत घटस्फोट (२०१८) झाल्यानंतर सपकाळे हा तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देत तिला वारंवार जळगावला बोलवत होता.
२०२१ मध्ये महिला जळगावला आल्यावर सपकाळेने तिला रेल्वे स्टेशनवर भेटून हॉटेलमध्ये नेले आणि लग्नाचे अमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर २०२१ ते २०२५ या काळात सपकाळेने वेळोवेळी तिला जळगावला बोलावून वेगवेगळ्या हॉटेलमध्ये गैरप्रकार केला.
दरम्यान, महिलेला त्याच्या मोबाईलवरून तो विवाहित असल्याची शंका आली. चौकशीत त्याने पत्नी व पाच वर्षांच्या मुलीबद्दल कबुली दिली. तरीही, घटस्फोट घेण्याचे आश्वासन देत तो महिलेला फसवत राहिला. तिला चुकीच्या संमतीपत्रावर सही करुन फसवणूक झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
महिलेच्या तक्रारीनंतर सपकाळे याच्यासह त्याची पत्नी आणि आईवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.





