यावल – यावल तालुक्यातील भूषण पंढरीनाथ नगरे यांची पोलीस वॉईज असोसिएशनच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती पोलीस वॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांनी जाहीर केली.
भूषण नगरे हे सन २०२० पासून जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, निवृत्त अधिकारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
भूषण नगरे हे पोलीस बांधवांशी नेहमीच सलोख्याचे संबंध राखून संपर्कात असतात. त्यांच्या या नियुक्तीबद्दल पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच मित्रमंडळी व नागरिकांतर्फे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





