मुंबई : गेल्या आठवड्यातील तेजीचा उत्साह आता कमी झालेला दिसत असून, चालू आठवड्यात शेअर बाजारात घसरणीचे वर्चस्व कायम आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या नव्या निर्णयामुळे भारतीय बाजार पुन्हा लाल रंगात उघडला आहे.
एच1-बी व्हिसावर निर्बंध घातल्यानंतर ट्रम्प यांनी औषधांवर तब्बल 100 टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. 1 ऑक्टोबरपासून अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या सर्व ब्रँडेड आणि पेटंट औषधांवर हा कर लागू होणार आहे. या निर्णयाचा थेट परिणाम भारतीय औषध कंपन्यांच्या शेअर्सवर झाला असून, गुंतवणूकदारांच्या भावनांवर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार पडझडीतच उघडला. सेन्सेक्स 250 अंकांनी घसरला तर निफ्टी 89 अंकांच्या घसरणीसह उघडला. औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक दबाव दिसून आला असून गुंतवणूकदारांच्या कमाईला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.





