जलगाव – जलगाव शहर पोलीस ठाण्यात (गु.र.नं. 351/2025) दाखल तक्रारीनुसार, पोलीस अधिकारी नितीन कमलाकर सपकाळे यांच्यावर कोलकात्यातील मुस्लिम युवतीला धर्मांतरासाठी भाग पाडणे, विवाहाचे आश्वासन देऊन विविध हॉटेलमध्ये अत्याचार करणे, तसेच पत्नी जिवंत असताना मंदिरात दुसरे लग्न करण्याचे धक्कादायक आरोप झाले आहेत.
पीडितेकडून फिर्याद नोंदवण्यासाठी तब्बल सहा महिने विविध पोलीस ठाण्यांकडे (रावेर, नशिराबाद, एमआयडीसी) धावपळ करून घेण्यात आली. अखेर 23 सप्टेंबर 2025 रोजी जलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र, आरोपी अजूनही अटकेत नसल्याने कायद्याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दाखल झालेल्या आणि मागितलेल्या कलमांचा तपशील
सध्या गुन्हा भारतीय दंड संहितेतील बीएनएस कलम 69, 318(2), 115(2), 352, 351(3) आणि 3(5) अंतर्गत दाखल आहे. परंतु, जिल्हा एकता संघटनेने जिल्हा पोलीस अधीक्षक व शहर पोलीस निरीक्षकांकडे अर्ज सादर करून अतिरिक्त कलमे 81, 82, 83, 87, 196, 198 व 201 दाखल करण्याची मागणी केली आहे.
एकता संघटनेच्या प्रमुख मागण्या
-
आरोपी पोलीस अधिकाऱ्याला त्वरित अटक व निलंबन
-
तपासात अतिरिक्त कलमे समाविष्ट करणे
-
तपास महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवणे व दुभाष्याच्या उपस्थितीत पीडितेचा जबाब नोंदवणे
-
पीडितेला जलगावात राहाताना पोलीस सुरक्षा
-
एफआयआरमध्ये झालेल्या विलंबाबाबत जबाबदारांवर कारवाई
संघटनेचा आरोप – “कायद्याची पायमल्ली”
एकता संघटनेचे संयोजक फारूक शेख म्हणाले, “जर हाच प्रकार एखाद्या अल्पसंख्याक युवकाकडून झाला असता, तर काही संघटना समाजात तणाव निर्माण केल्या असत्या. मात्र आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून न्यायासाठी लढणार आहोत. आम्हाला न्याय हवा, हिंसा नाही.”
तक्रार उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडे
ही तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक, शहर पोलीस निरीक्षक, पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक, गृह राज्यमंत्री, महिला आयोग, मानवाधिकार आयोग व अल्पसंख्याक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे. तसेच महिला संघटनांनाही प्रत पाठवण्यात आली.
प्रतिनिधी मंडळ
तक्रार सादर करताना मुफ़्ती खालिद, फारूक शेख, हाफिज रहीम पटेल, मौलाना गुफरान, अनीस शाह, मतीन पटेल, अॅड. आवेश शेख, रज्जाक पटेल, कासिम उमर, मोहसिन पटेल आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
-
पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना तक्रारपत्र देताना मुफ़्ती खालिद, फारूक शेख, अॅड. आवेश शेख, हाफिज रहीम पटेल आदी उपस्थित.





