मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी 75 हजार प्रशिक्षणार्थींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याची महत्त्वाकांक्षी योजना सुरू होत आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रमाचे’ उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.
दि. 9 ऑक्टोबर 2025 पासून राज्यातील 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि 141 शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये एकूण 2,506 तुकड्या सुरू होणार आहेत. या अभ्यासक्रमासाठी रोजगार इच्छुक तरुणांनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
कार्यक्रमाची उद्दिष्टे
-
अल्प कालावधीत रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन उद्योगाच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ तयार करणे.
-
महिला व ग्रामीण भागातील युवकांना कौशल्य प्रशिक्षणाची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता करून देणे.
-
आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित नव्या व्यवसायांमध्ये महाराष्ट्राला आघाडीवर नेणे.
पायाभूत सुविधा व शुल्क
या कार्यक्रमासाठी शासकीय आयटीआय व तांत्रिक विद्यालयांच्या पायाभूत सुविधांचा वापर संस्थेच्या नियमित वेळेनंतर केला जाणार आहे. प्रशिक्षण शुल्क दरमहा ₹1,000 ते ₹5,000 इतके असेल. 25 टक्के जागा संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी राखीव तर उर्वरित जागा बाहेरील उमेदवारांसाठी खुल्या असतील.
काळानुरूप बदलते अभ्यासक्रम
या योजनेंतर्गत अनेक आधुनिक आणि पारंपरिक व्यवसाय शिकविले जाणार आहेत, त्यामध्ये –
-
ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग
-
एरोस्पेस स्ट्रक्चर फिटर
-
इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT)
-
इलेक्ट्रिक व्हेईकल
-
सोलर एनर्जी
-
ड्रोन तंत्रज्ञान
-
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर
-
सायबर सुरक्षा
-
आर्टिफिशियल इंटेलिजन्स
-
ग्रीन हायड्रोजन
-
मोबाईल रिपेअर टेक्निशियन आदींचा समावेश आहे.
पात्रता
-
आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेणारे व पूर्ण केलेले विद्यार्थी
-
उच्च व तंत्रशिक्षणातील पदविका व पदवीधर
-
10 वी व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी
नोंदणीसाठी संकेतस्थळ: 👉 https://admission.dvet.gov.in





