जळगाव – गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई राज्य सरकारने त्वरित द्यावी, या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) जळगाव जिल्हा समितीच्या वतीने मंगळवारी ३० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी, शेतमजूर, घरकामगार आणि बांधकाम कामगार यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
यावेळी विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले. या निवेदनात माकप ने जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगार वर्गाला भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले.
निवेदनात म्हटले आहे की, जोरदार अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठे संकटात सापडले आहेत. शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याव्यतिरिक्त, अनेक जीर्ण झालेल्या घरांची पडझड झाली असून, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे, अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची जनावरे वाहन गेली किंवा दगावली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या सर्व नुकसानीची दखल घेऊन, राज्य शासनाने तातडीने पंचनाम्याचे काम पूर्ण करावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, तसेच ज्यांची घरे व जनावरे दगावली आहेत त्यांना त्वरित नुकसान भरपाई व अर्थसाह्य देण्यात यावे, अशी मागणी माकपच्या वतीने करण्यात आली. आंदोलकांनी सरकारच्या दिरंगाईवर तीव्र संताप व्यक्त केला.





