यावल – यावल तालुक्यातील परसाडे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. मीनाताई राजू तडवी यांच्या सरपंचपदावर टांगती तलवार लटकली होती. ग्रामपंचायत विवाद क्र. ४०/२०२४ अन्वये जिल्हाधिकारी, जळगाव यांनी १२ सप्टेंबर २०२४ रोजी दिलेल्या आदेशानुसार त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते.
या निर्णयाविरोधात मीनाताई तडवी यांनी अपील दाखल केले होते. अप्पर विभागीय आयुक्त, नाशिक विभागातील सुनावणीनंतर आयुक्त अजय मोरे यांनी १७ सप्टेंबर २०२५ रोजी आदेश पारित करत जिल्हाधिकारी, जळगाव यांचा निर्णय रद्दबातल ठरविला. यामुळे सरपंच मीनाताई तडवी यांचे पद कायम राहिले असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सत्याचा व नारीशक्तीचा विजय
निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना सरपंच सौ. मीनाताई तडवी म्हणाल्या,
“हा निकाल म्हणजे सत्याचा व नारीशक्तीचा विजय आहे. नवरात्र उत्सवात मिळालेला हा दिलासा माझ्यासाठी विशेष आहे. परसाडे ग्रामस्थांचे मी मनःपूर्वक आभार मानते. जनतेच्या आशीर्वादामुळेच हा विजय शक्य झाला. राजकारणात अडथळे येतातच, परंतु जनतेचा विश्वास आणि पाठिंबा कायम राहिल्यास यश हमखास मिळते.”
या अपील प्रकरणातील कायदेशीर कामकाज अॅड. जी. एम. पाटील (मनवेलकर) यांनी पाहिले.




