नवी मुंबई : सोन्याचे दर गगनाला भिडले असताना दसर्याला गुंजभर का होईना सोने खरेदी करण्याची परंपरा सुरू ठेवत गुरुवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर मुंबई सराफा बाजारात विक्रमी सोने विक्री नोंदवली गेली. दिवसभरात मुंबईत किमान 100 टन सोने खरेदी झाली. गतवर्षीच्या तुलनेत 20 टन जास्त सोने लुटले गेले. गतवर्षीच्या दसर्याला 80 टन सोने विक्रीची नोंद झाली होती.
दसर्याला 24 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 22 हजार रुपयांपर्यंत गेले असतानाही हा विक्रम नोंदवला गेल्याचे इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी पुढारीला सांगितले. तोळ्याचे चढे भाव बघता यंदाही गतवर्षीप्रमाणेच 80 टन सोने विकले जाईल, असे वाटले होते. मात्र, मुंबईकरांनी गतवर्षीच्या उलाढालीची बरोबरी करून वर आणखी 20 टन सोन्याची खरेदी नोंदवली.
सोन्याच्या दरात वर्षीच्या पहिल्याच दिवशी वाढ झाल्याचे चित्र समोर आले होते. सणासुदीत सोने पहिल्या टप्प्यात लाखाचा टप्पा पार करणार असल्याचे सराफ व्यावसायिकांनी स्पष्ट केले होते. दररोज सोने तोळ्यामागे 1200 ते 2000 रुपयांची भर पडत गेली आणि सोन्याने उच्चांक गाठला.





