मुंबई – भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्क येथे झालेल्या दसरा मेळाव्यानंतर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांचे भाषण “सडकं आणि नासलेलं” असल्याचे साटम म्हणाले.
साटम यांनी ठाकरेंना उद्देशून म्हटले की, “हिंदुत्व सोडल्यानेच तुमची अवस्था दयनीय झाली आहे. गर्दी कमी होण्याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राने शिवाजी पार्कवर पाहिले. हिंदुत्वाचे धडे वडिलांकडून घेतले असते, तर मुख्यमंत्री असताना तुमचे 54 पैकी 44 आमदार पळून गेले नसते.”
त्यांनी ठाकरेंच्या “बेस्ट सीएम” या उपाधीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “कोविड काळात मुंबईकर अडचणीत होते, त्यावेळी तुम्ही बेस्ट सीएम कसे झाला? हे मॅनेज कसे झाले, याचे उत्तर तुम्ही जनतेला दिले असते तर बरे झाले असते,” असा टोला त्यांनी लगावला.
प्रचार फेऱ्यांबाबतही त्यांनी गंभीर आरोप केले. “तुमच्या प्रचार सभांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले, उमेदवाराबरोबर आरोपी दिसला – हेच तुमचे हिंदुत्व आहे,” असे साटम म्हणाले.
शेवटी त्यांनी ठणकावले की, मुंबईत आता चर्चा होणार ती फक्त उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचार, दहशतवादाशी असलेल्या नात्यांची आणि मतांसाठी केलेल्या राजकारणाचीच. “यापुढे तुमच्या भ्रष्टाचाराचा व राजकीय रावणाचा दहन होणारच,” असा इशारा साटम यांनी दिला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. “आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका, मग गप्पा मारा. भगवा हा आमच्या हातात आहे, तुमच्या हातात कधीच नव्हता,” असे ठाकरेंनी म्हटले.





