मॉस्को /नवी दिल्ली – अमेरिकेसोबत वाढलेल्या तणावाच्या आणि रशियन कच्च्या तेलाच्या आयातीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येत आहेत. ५ व ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा होणार आहे.
संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८०व्या सत्रात रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या दौऱ्यात व्यापार, संरक्षण, तांत्रिक सहकार्य, वित्तीय विषय, आरोग्यसेवा, हाय-टेक्नोलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तसेच एससीओ आणि ब्रिक्स मंचांवरील समन्वय यांसारख्या मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे.
लावरोव म्हणाले, “आम्ही भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधांचा आदर करतो. पंतप्रधान मोदींचे परराष्ट्र धोरण आम्हाला मान्य आहे आणि आम्ही भारताशी सतत उच्चस्तरीय संपर्कात आहोत.”
रशियन तेलाच्या आयातीवरून अमेरिकेने भारतावर लादलेल्या टॅरिफबाबत ते म्हणाले की, “भारत-रशिया आर्थिक भागीदारी धोक्यात नाही. भारत आपल्या भागीदारांची निवड स्वतः करतो. भारत-अमेरिका व्यापाराबाबत अटी असतील तर त्यावर चर्चा शक्य आहे; पण भारत आणि तिसऱ्या देशाच्या व्यवहारात फक्त संबंधित देशच निर्णय घेतील.”
विशेष म्हणजे, पुतिन यांच्या भारत भेटीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढू शकते, असे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मत आहे.





