मुंबई – महाराष्ट्रातील आयातदार आणि निर्यातदारांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आजपासून कागदी बाँडची जुनी पद्धत कायमची इतिहासजमा होत असून, तिच्या जागी अत्याधुनिक ई-बॉण्ड प्रणाली लागू करण्यात आली आहे.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली. या बदलामुळे व्यापार आणि महसूल प्रक्रियेत डिजिटल क्रांती घडणार असून, व्यवहार अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि गतीमान होणार आहेत.
ई-बॉण्ड प्रणालीमुळे —
-
कस्टम अधिकाऱ्यांना तात्काळ पडताळणी शक्य होईल.
-
फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसेल.
-
बाँड तयार करणे, सादर करणे, बदल करणे अधिक सोपे होईल.
-
आयात-निर्यातदारांना वेगवेगळ्या कागदी बाँडची आवश्यकता राहणार नाही.
या प्रक्रियेत कस्टम अधिकारी आणि ग्राहकांच्या इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण व्यवहार अधिक विश्वासार्ह होणार आहेत.
ई-बॉण्ड म्हणजे काय?
ई-बॉण्ड ही पूर्णतः डिजिटल प्रणाली आहे जी कस्टम व्यवहारांमध्ये कागदी बाँडची गरज संपवते. एका इलेक्ट्रॉनिक बाँडद्वारे सर्व व्यवहार पूर्ण करता येतात. ही प्रणाली कागदविरहित, जलद आणि पारदर्शक व्यवहार सुनिश्चित करते.
‘कस्टम ई-बॉण्ड’ प्रणालीचा महाराष्ट्रात आजपासून अधिकृत शुभारंभ झाला आहे. राज्य शासनाने या प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तीन प्रमुख संस्थांची मदत घेतली आहे. हा निर्णय ‘Ease of Doing Business’ला मोठी चालना देणार असून व्यापार क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.





