मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन मोबाईल ॲप ‘आपली एसटी’ लाँच केले आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेले हे ॲप प्रवाशांना बसचे नेमके स्थान, वेळापत्रक आणि मार्ग माहिती सहज उपलब्ध करून देईल.
राज्यातील 12 हजारांहून अधिक बस आणि 1 लाखाहून अधिक मार्गांचे मॅपिंग करून हे ॲप विकसित करण्यात आले आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी या मराठमोळ्या ॲपचे नाव दिले आहे.
या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना खालील सुविधा मिळणार आहेत :
-
दोन थांब्यांदरम्यान चालणाऱ्या बसचे वेळापत्रक आणि मार्ग माहिती.
-
आरक्षित तिकिटाच्या बस क्रमांकाद्वारे थेट लोकेशन ट्रॅकिंग.
-
सुरक्षेसाठी आपत्कालीन क्रमांकावर एक क्लिक कॉल करण्याची सोय.
बस ट्रॅकिंग कसे होणार?
तिकिटावरील ट्रिप कोड ॲपमध्ये टाकून प्रवासी बसचे सध्याचे स्थान तपासू शकतात. त्याच मार्गावरील इतर बस, वेळापत्रक आणि थांब्यांची माहितीही ॲपमध्ये पाहता येईल. मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून या यंत्रणेवर देखरेख ठेवली जाणार आहे. सध्या 12 हजार बसमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली असून उर्वरित बसमध्ये ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल.





