जळगाव – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात कनिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. मोहित दीपक गादिया (वय २६) यांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून शुक्रवारी (३ ऑक्टोबर) रात्री साडेआठच्या सुमारास मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात संताप व्यक्त होत असून, जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भादली येथून फटाक्याच्या अपघातात जखमी झालेले चार रुग्ण उपचारासाठी आले होते. त्यावेळी नातेवाईकांनी अत्यावश्यक विभागात प्रचंड गर्दी केली. डॉक्टर गादिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी “गर्दी करू नका, बाहेर थांबा, आम्हाला उपचार करू द्या” अशी सूचना केली. यामुळे रागावलेल्या नातेवाईकांनी डॉक्टर गादिया यांना कानशिलात मारली व खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
इतर डॉक्टर आणि कर्मचारी धावून आले व त्यांनी गादिया यांना वाचवले. मात्र या हल्ल्यात त्यांच्या कानाचा पडदा फाटल्याने त्यांना काही आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे. रात्री ११ वाजता या घटनेची नोंद जिल्हापेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.





