प्रतिनिधी – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत साकळी आणि जळगाव येथील सुप्रसिद्ध कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तिसऱ्या वर्षी मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालय, साकळी येथे झालेल्या या शिबिरात परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. विशेषतः मोतीबिंदू आणि इतर नेत्रविकारांनी त्रस्त असलेल्या ग्रामीण भागातील रुग्णांना या उपक्रमाचा मोठा लाभ झाला.
शिबिरात कांताई नेत्रालयाच्या तज्ञ डॉक्टरांनी उपस्थित रुग्णांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन, निदान व उपचार सेवा दिली. तसेच, पुढील शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्णांची नोंदणी करण्यात आली.
ग्रामपंचायत साकळीच्या वतीने नागरिकांना मोफत तपासणी, औषधोपचार आणि आवश्यक वैद्यकीय मदत देण्यात आली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच आरोग्य विभागाचे विशेष सहकार्य लाभले.
या उपक्रमामुळे साकळी व परिसरातील नागरिकांना मोफत व दर्जेदार नेत्रसेवा मिळाली असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आरोग्य उपक्रम अत्यंत उपयुक्त व कौतुकास्पद ठरला आहे.





