पहुर (ता. जामनेर) – शेती शिवारांचा श्वास असलेल्या पाणंद रस्त्यांअभावी शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे रस्ते मोकळे करताना कोणीही अडथळा निर्माण करू नये; तसे प्रयत्न केल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा कठोर इशारा तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आयोजित विशेष ग्रामसभेत ते बुधवारी पहुर पेठ ग्रामपंचायतीत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अब्बु अफजल तडवी होते.
तहसीलदार आगळे म्हणाले, “गावातील सर्व पाणंद रस्ते महामार्गाशी जोडायचे आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतापर्यंत पोहोचणारा पाणंद रस्ता निर्माण करायचा आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करून प्रशासनाला मदत करावी.”
ते पुढे म्हणाले, “कोणीही या कामात अडथळा आणला किंवा पाणंद रस्त्यांवर आडकाठी केली, तर त्याची सखोल चौकशी करण्यात येईल आणि दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई केली जाईल.”
या ग्रामसभेला सरपंच अब्बु अफजल तडवी, प्रदीप लोढा, शरद पांढरे, महेश पाटील, डॉ. संभाजी क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामसभेत गावातील पाणंद रस्ते महामार्गाशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ग्रामविकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.





