चोपडा – आरक्षण बचावासाठी तालुक्यातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत चोपडा तहसील कार्यालयावर आदिवासी एकता परिषदेच्या वतीने भव्य मोर्चा काढला. विविध मागण्यांसाठी हा मोर्चा विश्रामगृह येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आला.
या वेळी आदिवासी परिषदेचे पदाधिकारी व बांधवांच्या वतीने तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात सांगण्यात आले की, महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातींच्या यादीत बंजारा, गोरा बंजारा, नाईकडा, धनगर या तत्सम जातींचा समावेश करण्यात येऊ नये. तसेच अनुसूचित जमातींच्या आदिवासींच्या जमिनी करार तत्त्वावर देण्यासंबंधी शासनाने घेतलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय, लडाखमधील आदिवासी शास्त्रज्ञ सोनम वागचुंग यांच्यावर लावण्यात आलेले देशद्रोहाचे आरोप खोटे असून त्यांना तात्काळ मुक्त करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली. “आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवा आणि आदिवासी समाजावर अन्याय होऊ देऊ नका; बोगस आदिवासींना आरक्षण देऊ नका,” असा इशारा देत आदिवासी बांधवांनी आवाज उठवला.
या प्रसंगी आदिवासी एकता परिषदेचे तालुकाध्यक्ष दत्तूभाऊ पवार, सुनील गायकवाड, यशवंत भिल्ल, बळीराम बारेला, प्रवीण करनकाळ यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्चा शांततेत पार पडला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोपडा विभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह पोलिस दल तैनात होते.





