भुसावळ – कामानिमित्त भुसावळ येथे आलेल्या मित्रांमध्ये किरकोळ वाद झाल्याने जळगाव येथील तरुणाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची धक्कादायक घटना शहरातील कंडारी शिवारात रविवारी (५ ऑक्टोबर) रात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणारे जितेंद्र राजेंद्र साळुंखे (वय ४०) हे आपल्या तीन मित्रांसह कामानिमित्त भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात गेले होते. तिथे एका हॉटेलमध्ये मद्यपान करताना चौघांमध्ये वाद झाला. वाद वाढताच तिघांनी मिळून जितेंद्र यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.
गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी सरकारी रुग्णालयात हलविण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राजू उर्फ बाबू अशोक सपकाळे (वय ३८), मयूर उर्फ विक्की दीपक अलोने (वय ३२), दोन्ही रा. शिवाजी नगर, जळगाव, आणि दीपक वसंत शंखपाळ (रा. कंडारी, भुसावळ) यांचा समावेश आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मृत जितेंद्र साळुंखे हे पत्नी आणि तीन मुलांसह जळगाव येथे वास्तव्यास होते. ते हातावर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





