मुंबई – सातारा जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम आणि पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख यांना गैरवर्तनाच्या आरोपांमुळे सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या दोघांनाही १ ऑक्टोबरपासून पदमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले.
जामिनासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यावर होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रथम सत्र न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, दोन्ही न्यायालयांनी दिलासा देण्यास नकार दिला. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले नव्हते. त्यानंतर उच्च न्यायालय प्रशासनाच्या शिस्तपालन समितीने चौकशी करून त्यांचा अहवाल सादर केला.
दुसरीकडे, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख यांच्यावरही गंभीर आरोप होते. बॅलार्ड पिअर न्यायालयात दंडाधिकारी म्हणून कार्यरत असताना अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत असलेल्या गुन्ह्यांच्या सुनावणीत त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या जप्त अमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप होता. या प्रकरणीही शिस्तपालन समितीकडून चौकशी करण्यात आली होती.
दोन्ही चौकशी अहवालांच्या आधारे उच्च न्यायालयाने दोन्ही न्यायाधीशांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला.





