मुंबई – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि शांततेचा भंग होऊ नये, यासाठी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाने ड्रोन आणि फ्लाइंग कंदील उडविण्यास तसेच विक्री करण्यास बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.
दिवाळीच्या काळात मुंबईत फटाक्यांची आतषबाजी, ड्रोन आणि फ्लाइंग कंदील उडविण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे आगीचे, अपघातांचे किंवा सुरक्षेचे धोके निर्माण होतात. तसेच काही नामांकित व्यक्तींना हवाई उपकरणांच्या माध्यमातून लक्ष्य केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने 7 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरदरम्यान ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स आणि हॉट एअर बलून यांच्या उड्डाणावर बंदी लागू राहणार आहे. फ्लाइंग कंदील साठवणे व विक्री करणे देखील मनाईच्या कक्षेत आहे.





