यावल – यावल शहरात सामाजिक एकतेचा संदेश देणारा हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला. दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री कुंभारवाडा व भोईवाडा येथील मोहल्ला बाबूजीपुरा पंच मंडळ व पीडित परिवार तर्फे श्री संत गोरोबा दुर्गा उत्सव मित्र मंडळाचा सत्कार करण्यात आला.
अब्दुल्ला हन्नान यांच्या दुर्दैवी हत्येनंतर बाबूजीपुरा परिसरात शोककळा पसरली होती. या घटनेनंतर श्री संत गोरोबा दुर्गा उत्सव मंडळाने अपार संवेदनशीलता दाखवत यंदाचा नवरात्री उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला. दुर्गा स्थापनेच्या दिवशी व मिरवणुकीत वाद्य न वाजवणे, सांस्कृतिक कार्यक्रम न घेणे आणि शांततेत सण साजरा करणे हा निर्णय मंडळाने घेतला होता.
या मानवतावादी भूमिकेबद्दल आणि सामाजिक जाणिवेबद्दल पीडित परिवाराने मंडळाचा विशेष सन्मान केला. या प्रसंगी यासीन खान नथ्थे खान, जहीर एस. खान, इनायत जनाब, अजगर खान, माजीद जनाब यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलीम शेख यांनी केले, तर आभार प्रदर्शन नितीन महाजन यांनी मानले.
हा उपक्रम यावल शहरात धर्मनिरपेक्षतेचा आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.





