यावल – यावल तालुका हा प्रामुख्याने आदिवासी बहुल भाग असून, येथील ग्रामस्थांना बँकेच्या सेवांबाबत गंभीर अडचणींचा सामना करावा लागत असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे स्टेट बँक व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.
ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, बँकेत पैसे जमा करणे किंवा काढण्यासाठी तीन ते चार तास रांगेत उभे राहावे लागते. गेल्या दोन वर्षांपासून हीच परिस्थिती कायम असून, दुपारी एक ते दोन या वेळेत बँक पूर्णतः बंद ठेवली जाते आणि बाहेर उभ्या असलेल्या ग्राहकांना “जेवणाची वेळ आहे” असे सांगून बाहेर काढले जाते, अशी बाब समोर आली आहे.
या अन्यायकारक वागणुकीविरोधात नागरिकांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे तक्रार केली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत बँकेच्या व्यवस्थापकांना निवेदन सादर केले. या निवेदनात ग्राहक हक्कांचे उल्लंघन थांबवणे, गर्दीच्या वेळेस अतिरिक्त काउंटर सुरू करणे, पासबुक प्रिंट मराठी किंवा हिंदीत देणे, बँकेत तक्रार पेटी बसवणे आणि व्यवहार वेळेची स्पष्ट सूचना लावणे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष आकाश चोपडे, शहराध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.





