साकळी (ता. यावल) – नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गावातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी साकळी ग्रामपंचायतीतर्फे गावात प्रथमच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या उपक्रमाचे लोकार्पण फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले.
सरपंच दिपकभाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला सुरुवात झाली असून, गावातील महात्मा फुले चौक, ग्रामपंचायत कार्यालयासमोरील परिसर, तसेच मुख्य चौक ते मुजुमदार चौकापर्यंत एकूण १५ फिरते सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमुळे गावात भयमुक्त वातावरण निर्माण होऊन शिस्तबद्धता राखण्यास मदत होणार आहे.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना डीवायएसपी अनिल बडगुजर यांनी साकळी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराचे कौतुक केले आणि गावातील जातीय सलोखा व सामाजिक एकता टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सरपंच दिपक पाटील, तंटामुक्ती समितीचे कार्याध्यक्ष सुभाष महाजन, उपाध्यक्ष युनूसशेठ पिंजारी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंटामुक्ती समितीचे सचिव योगेश खेवलकर यांनी केले, तर कार्यक्रमाला उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समितीचे सदस्य आणि गावातील नागरिक उपस्थित होते.
हा उपक्रम साकळी ग्रामपंचायतीच्या सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सलोख्यपूर्ण गावाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरला आहे.





