यावल तालुका – यावल तालुक्यातील किनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा दि. 6 ऑक्टोबर रोजी गावात दाखल झाला असून, ग्रामस्थांनी उत्साहात मिरवणूक काढून महाराजांच्या पुतळ्याचे जल्लोषात स्वागत केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी किनगाव ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिली आहे. ‘श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज कृती समिती’ आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हे स्मारक उभे राहात आहे. पुतळा शेगाव येथे साकारण्यात आला असून, गावात पोहोचताच “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि “राजे अमर रहें” अशा घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेला.
माजी आमदार रमेश चौधरी यांच्या कृषी विद्यालयापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. महिलांनी ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत केले. गावातील चौकात भगवे झेंडे आणि पताका लावण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि रांगोळ्यांनी परिसर सजविण्यात आला होता.
स्मारकाची उंची तब्बल ४२ फूट
अश्वारूढ पुतळ्याची उंची १२ फूट असून, तो ठेवण्यात आलेल्या चबुतऱ्याची उंची ३० फूट आहे. त्यामुळे संपूर्ण स्मारकाची उंची ४२ फूटांपर्यंत पोहोचली आहे. लवकरच विधिवत कार्यक्रमाद्वारे या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीतर्फे देण्यात आली.





