जळगाव- सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या अश्लील घटनेचा तीव्र निषेध करत एकता संघटनेचे वकील आवेश शेख, आमिर शेख आणि अल्तमश शेख यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमंत हरकर यांना सविस्तर निवेदन सादर केले.
या निवेदनात संघटनेने ६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान वकील राकेश किशोर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वर्तनावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. किशोर यांनी न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर चप्पल फेकून अपमान केला, ही घटना केवळ सर्वोच्च न्यायालयाचाच नव्हे तर संविधान, न्यायव्यवस्था आणि धार्मिक सौहार्दाचा घोर अपमान असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या
-
राकेश किशोर यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९९, १९६, ३५२ तसेच अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ च्या कलम ३(१)(आर) आणि ३(१)(एस) अंतर्गत दंडात्मक कारवाई करावी.
-
बार कौन्सिल ऑफ इंडिया ने त्यांचा वकिली परवाना तात्काळ रद्द करावा.
-
सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलने एफआयआर नोंदवण्यास उशीर का झाला याची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी.
-
न्यायालय परिसरात कडक आचारसंहिता व सुरक्षा व्यवस्था लागू करावी.
-
न्यायव्यवस्थेचा सन्मान राखण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घ्यावी.
संघटनेचा इशारा
वकील राकेश किशोर यांनी आपल्या कृत्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला व उलट आपल्या वर्तनाचे समर्थन केले, असेही निवेदनात नमूद आहे.
एकता संघटनेचे समन्वयक फारुख शेख यांनी सांगितले की, “देशाच्या न्यायव्यवस्थेवर हल्ला म्हणजे संविधानावर हल्ला आहे. अशा कृतींवर कठोर कारवाई करणे ही सरकार व न्यायिक संस्थांची जबाबदारी आहे.”
निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या
या निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक, मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य), कायदा मंत्री (भारत सरकार), बार कौन्सिल ऑफ इंडिया (नवी दिल्ली) व सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल (नवी दिल्ली) यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
शिष्टमंडळात उपस्थित
फारुख शेख, हाफिज रहीम पटेल, नदीम मलिक, अन्वर शिकलगार, अनीस शाह, कासिम उमर, ॲड. आवेश शेख, ॲड. आमिर शेख, ॲड. अल्तमश शेख, आरिफ देशमुख, मौलाना गुफरान, मौलाना कासिम नदवी, मौलाना वसीम पटेल, रज्जाक, युसूफ खान आदींचा समावेश होता.





