जळगाव – जळगाव महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठीची अंतिम प्रभागरचना गुरुवारी (ता. ९) जाहीर होणार आहे. यापूर्वी प्रशासनाने ३ सप्टेंबर रोजी प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध केली होती. त्यावर ३ ते १५ सप्टेंबरदरम्यान नागरिकांकडून एकूण ७० हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या.
यानंतर १६ ते १९ सप्टेंबरदरम्यान झालेल्या सुनावणीनंतर संबंधित अहवाल विभागीय कार्यालय व निवडणूक विभागाला सादर करण्यात आला.
निवडणूक आयोगाकडून मंजुरी मिळाल्यानंतर अंतिम प्रभागरचना उद्या (ता. ९) दुपारी बारा वाजता महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाबाहेर नागरिकांच्या पाहणीसाठी लावण्यात येणार आहे.
प्रारूप रचनेत काही प्रभागांचे सीमांकन बदलले गेले असून, काहींचे विलीनीकरण व विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रभागांमध्ये मोठे बदल झाले असून संभाव्य उमेदवारांचे राजकीय गणित बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





