यावल – येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य प्रा. डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र विभागामार्फत ‘डिजिटल अर्थव्यवस्थेत ग्राहकांचे वर्तन’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार होते, तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. वी. एल. कोष्टी यांनी मार्गदर्शन केले.
आपल्या प्रभावी मार्गदर्शनात डॉ. कोष्टी यांनी सांगितले की, डिजिटल अर्थव्यवस्थेत ग्राहक अधिक माहितीपूर्ण निर्णय घेतात, ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देतात आणि सेवेच्या अनुभवाला अधिक महत्त्व देतात. त्यामुळे व्यवसायांना वैयक्तिकृत आणि संवादात्मक विपणन धोरणे राबवावी लागतात. ग्राहक आज डिजिटल माध्यमांतून माहिती शोधतात, इतरांच्या मतांचा विचार करतात आणि थेट ब्रँडशी संवाद साधतात, ज्यामुळे त्यांच्या खरेदीच्या सवयी आणि ब्रँड निष्ठा बदलत आहेत, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. खैरनार यांनी आपल्या भाषणात म्हटले की, डिजिटल अर्थव्यवस्थेमुळे ग्राहक अधिक सजग झाला असून विक्रेत्यांना आपल्या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणि सुलभता वाढली आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सी. टी. वसावे यांनी केले.
या प्रसंगी प्रा. नागेश्वर जगताप, प्रा. मृणाल धायडे, तसेच अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





