विवरे (ता. रावेर) – विवरे ते रावेरदरम्यानच्या बुरहानपूर–अंकलेश्वर महामार्गावर उभारलेल्या दोन पोलिस चौक्या सध्या केवळ शोपीस ठरत आहेत. या चौक्यांमध्ये पोलिस कर्मचारी न राहिल्याने रात्रीच्या वेळी या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पारसा नाल्याजवळील निभोरा व रावेर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत काही वर्षांपूर्वी या चौक्या उभारण्यात आल्या होत्या. त्या काळात या भागात रस्ता लूट, अपघात आणि अन्य गुन्ह्यांच्या घटना वाढल्या होत्या. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि रात्री मदत मिळावी म्हणून त्या वेळी तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी या चौक्या उभारल्या होत्या.
मात्र, आज या चौक्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. चौक्यांभोवती घाणीचे साम्राज्य पसरलेले असून, रात्रीच्या वेळेला कोणताही पोलिस कर्मचारी तैनात नसतो. त्यामुळे या चौक्यांचे अस्तित्व फक्त नावापुरते उरले आहे.
नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत की —
“या पोलिस चौक्यांचे भाग्य उजाडणार का? पुन्हा सुरू होणार का?”
स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन या चौक्यांमध्ये पोलिस तैनात करावेत, अशी मागणी केली आहे.





