मुंबई – माहिम येथील ऐतिहासिक किल्ला आणि त्याचा सुमारे तीन एकर परिसर आता विकसित करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली आहे. याबाबतची महत्त्वाची बैठक येत्या आठवड्यात मंत्रालयात घेण्यात येणार आहे.
मंत्री शेलार यांनी नुकतीच माहिम किल्ला परिसराची पाहणी केली. यावेळी मुंबई महानगरपालिका, पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), हेरिटेज विभागातील सल्लागार तसेच मुंबई पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
इतिहासात डोकावल्यास, माहिमचा किल्ला ही मुंबईतील सर्वात पुरातन वास्तूंपैकी एक मानली जाते. तेराव्या शतकात राजा बिंबाराजाने याची उभारणी केली होती. नंतर चौदाव्या शतकात गुजरातच्या सुलतानाने हल्ला केला, आणि सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी किल्ला नव्याने बांधला. आजचा माहिम किल्ला त्याच काळातील आहे.
किल्ल्याजवळ बांद्रा आणि वरळीचे किल्ले असल्याने हा परिसर ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून येथे अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढले होते. मुंबई महानगरपालिकेने या अतिक्रमणांवर कारवाई करून किल्ल्याला मुक्त केले. त्यामुळे माहिमचा किल्ला आज पुन्हा “मोकळा श्वास” घेत आहे.





