नवी दिल्ली – मध्य प्रदेशात कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे 23 बालकांचा मृत्यू झालेल्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. तपासात श्रीसन फार्मा कंपनीच्या कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मितीत गंभीर त्रुटी झाल्याचे समोर आले आहे. या सिरपमध्ये शरीराला हानीकारक रसायनांचा समावेश झाल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणात श्रीसन फार्माचे संचालक गोविंदन रंगनाथन यांना अटक करण्यात आली आहे. ते पत्नीसमवेत चेन्नईतील घर आणि कांचीपुरम येथील कारखान्यावर कुलूप लावून फरार झाले होते. दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर मध्य प्रदेश सरकारच्या विशेष तपास पथकाने त्यांना अटक केली.
या प्रकरणानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी कठोर भूमिका घेतली आहे.
> पुढील काळात प्रत्येक कफ सिरपची बॅच बाजारात जाण्यापूर्वी प्रयोगशाळेत तपासणे अनिवार्य करण्यात आले आहे.
>महाराष्ट्र शासनाने कोल्ड्रिफ कफ सिरपची विक्री तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
>औषध विक्रेत्यांना साठा असल्यास तो कंपनीकडे परत पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रंगनाथन यांच्या अटकेसाठी पोलिसांनी ₹20,000 चे बक्षीस जाहीर केले होते. अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.





