जळगाव – “हाय प्रॉफिट”चे आमिष दाखवत ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली एका कृषी कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याची तब्बल ₹५ लाख १४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशाबाबानगर येथील भागवत किसन पाटील (वय ६१) हे कृषीधन सीड्स प्रा. लि., जालना या कंपनीत सीनिअर अकाउंट एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहेत. १४ ऑगस्ट रोजी त्यांच्या व्हॉट्सअॅपवर ‘Wealth Index-K13’ नावाच्या ट्रेडिंग ग्रुपमध्ये त्यांचा नंबर जोडण्यात आला.
काही दिवस ग्रुपमधील संदेश पाहिल्यानंतर ‘Assistant Annie’ नावाच्या व्यक्तीने गुंतवणुकीच्या योजना सांगितल्या — ५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक आणि ५ टक्के कमिशनचे आमिष देण्यात आले.
सुरुवातीला पाटील यांनी ५ हजार रुपये गुंतवले. काही वेळातच ₹९४२ रुपयांचा नफा दाखवण्यात आल्याने त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर १८ ऑगस्ट ते २ ऑक्टोबरदरम्यान त्यांनी विविध खात्यांमध्ये एकूण ₹५.१४ लाख रुपये जमा केले. त्यांच्या प्रोफाइलवर ठगांनी तब्बल ₹१३ लाखांचा नफा दाखवला होता.
मात्र, ४ ऑक्टोबर रोजी नफा काढण्याचा प्रयत्न करताच खाते ब्लॉक झाले आणि व्यवहार थांबले. तेव्हा पाटील यांना फसवणुकीची जाणीव झाली. त्यांनी तत्काळ सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.





