जळगाव – आव्हाणे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीचा प्रसंग गटशिक्षणाधिकारी अजित तडवी यांनी स्वतःच्या धाडसाने विझवून मोठा अनर्थ टाळला. या घटनेत तडवी यांच्या हाताला किरकोळ भाजल्याची दुखापत झाली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
घटना शुक्रवारी सकाळी घडली. जळगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. अजित तडवी हे प्रथम सत्र परीक्षेच्या निमित्ताने जि.प. मुलींची शाळा, आव्हाणे येथे अचानक भेट देत होते. भेटीदरम्यान अचानक समोरच असलेल्या जि.प. उर्दू शाळेच्या किचन शेडमधून धूर आणि गोंगाट ऐकू आला. तपासल्यावर लक्षात आले की, पोषण आहार शिजवित असताना गॅस गळती होऊन आग लागली आहे.
त्यावेळी उपस्थित स्वयंपाकी महिला आणि मदतनीस बाहेर धावत आल्या होत्या. दरम्यान, आगीच्या ज्वाळांमुळे कोणीही आत जाऊ शकत नव्हते. प्रसंगावधान राखत तडवी यांनी पाण्याची नळी व ओले गोणपाट घेतले आणि शिक्षक नन्नवरेताई, कोकीलाताई व इतरांच्या मदतीने आगीवर पाणी फेकून आगीचा भडका कमी केला. त्यानंतर त्यांनी किचन शेडमध्ये उडी मारून गॅस रेग्युलेटर बंद केला आणि संभाव्य स्फोट टाळला.
थोडा विलंब झाला असता तर गॅस सिलिंडर स्फोट होण्याची शक्यता होती, मात्र तडवी यांच्या धाडसामुळे मोठी जीवितहानी टळली.
घटनेनंतर डॉ. संदीप पवार, अरुण संध्यान, अशफाक सर आणि अन्य शिक्षकांनी तडवी यांना तातडीने उपचारासाठी आव्हाणे गावातील खाजगी दवाखान्यात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे.
स्थानिक नागरिक, शिक्षकवर्ग आणि शिक्षण विभागातील सहकाऱ्यांनी तडवी यांच्या धाडसी कृतीचे कौतुक केले आहे.





