पुणे – ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया आता अनिवार्य करण्यात आली आहे. दोन महिन्यांच्या आत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या लाभार्थींना योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
योजनेच्या सुरुवातीपासूनच विरोधकांनी या योजनेवर टीका करत ती सरकार बदलल्यानंतर बंद होईल, असा दावा केला होता. मात्र, तसे न होता योजना सुरूच राहिली. अलीकडेच सरकारने लाभार्थींच्या पडताळणीसाठी ई-केवायसी प्रक्रिया लागू केली आहे. परंतु या प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार आहे.
अजित पवार म्हणाले,
“लाडकी बहीण योजनेचा निधी पात्र लाभार्थींनाच मिळायला हवा, म्हणूनच ई-केवायसी आवश्यक आहे. अडचणी लक्षात घेऊन मुदत वाढवू, पण केवायसी केलीच पाहिजे.”
दरम्यान, मागील वर्षी दीपावळीत सुरू केलेली ‘आनंदाचा शिधा’ योजना निधीअभावी बंद करण्यात आली आहे. यावर भाष्य करताना पवार म्हणाले की,
“काही योजना कायम चालत नाहीत. परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात. मात्र ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सरकार सकारात्मक आहे आणि आवश्यक बदल करून तिचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवू.”





