जळगाव – १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकी देत मित्राच्या खोलीवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार गेल्या एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत घडल्याचे समोर आले असून, याप्रकरणी फरहान उर्फ मुन्ना उसनुद्दीन सैयद (रा. आव्हाणा, ता. जळगाव) या तरुणाविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय मुलगी ही शहरातील टायपिंग क्लासला जात होती. त्याचवेळी आरोपी फरहान सैयद तिला वारंवार भेटत असे. सुरुवातीला फिरायला येण्याचा प्रस्ताव देत होता, मात्र मुलीने नकार दिला. तरीही तो तगादा लावत राहिला.
दरम्यान, जून महिन्यात आरोपीने क्लासजवळ येऊन मुलीला धमकी देत दुचाकीवर बसवले आणि मित्राच्या घरात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर मुलीला रिक्षाद्वारे बसस्थानकावर सोडून दिले. पुढील काही महिन्यांत आरोपीने तीन ते चार वेळा पुन्हा तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगण्यात आले आहे.
नंतरही त्रास सुरू राहिल्याने मुलीने अखेर आई-वडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक विजय पाटील करीत आहेत.





