मुंबई – लहान मुलांच्या बाल आधार नोंदणी प्रक्रियेत कागदपत्रांमधील विसंगतींमुळे पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जन्म दाखल्यावरील नावातील त्रुटी, आई-वडिलांच्या नावातील फरक किंवा पत्त्यांतील विसंगती यामुळे अनेक मुलांची आधार नोंदणी अडकून पडली आहे.
मूळ कागदपत्रांतील किरकोळ चुका दुरुस्त न झाल्याने आधार नोंदणी केंद्रांवर नागरिकांना नकार दिला जात आहे. यामुळे अनेक पालक त्रस्त झाले असून, “नेमकी कोणती कागदपत्रे द्यावीत?” असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काय अडचणी निर्माण होत आहेत ?
-
जन्म दाखल्यावरील नाव अपूर्ण किंवा चुकीचे
-
आई-वडिलांच्या आधार कार्डवरील नावांमध्ये फरक
-
पत्त्यातील विसंगती
-
कागदपत्रातील छोट्या त्रुटींमुळे नोंदणी नाकारणे
या समस्यांमुळे बालकांचे आधार क्रमांक निर्माण न होता शाळा प्रवेश, सरकारी योजना आणि आरोग्य सेवांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.
युआयडीएआयकडे उपाययोजनेची मागणी
‘महाराष्ट्र व्हीएलई संवाद’ या संघटनेने नागरिकांच्या वतीने ही गंभीर समस्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे (UIDAI) ई-मेलद्वारे मांडली आहे.
संघटनेची मागणी आहे की —
“नाव किंवा पत्त्यातील किरकोळ फरकांसाठी शपथपत्र किंवा पर्यायी कागदपत्र स्वीकृत करण्याची तात्पुरती तरतूद करावी, जेणेकरून बाल आधार प्रक्रिया सुरळीत होईल.”





