नवी दिल्ली – उत्तराखंडची सीमा सध्या शांत असली तरी, चीनकडून संभाव्य हालचालींचा विचार करता सतत सतर्क राहणे अत्यावश्यक आहे, असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी देहरादून येथे आयोजित रॅलीत सांगितले.
उत्तराखंडची चीनसोबत सुमारे ३५० कि.मी. आणि नेपाळसोबत २७५ कि.मी. सीमा असून, हे राज्य रणनीतीदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानले जाते. चौहान म्हणाले की, भारत-चीन सीमावाद अजूनही काही ठिकाणी कायम आहेत, आणि बाड़ाहोती परिसरात पूर्वी तणावाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सीमेसंदर्भात हलगर्जीपणा कधीही करता कामा नये.
जनरल चौहान म्हणाले की, सीमावर्ती भागातील नागरिकांनीही देशाच्या सुरक्षेत सक्रिय भूमिका बजवावी, कारण सीमा रक्षण केवळ सैन्याची जबाबदारी नसून नागरिकांची सतर्कताही तितकीच महत्त्वाची आहे. त्यांनी सीमावर्ती माजी सैनिकांना ‘डोळे’ असे संबोधित करत सांगितले की, “हे लोक सतर्क राहिले तर आपली सीमा अधिक सुरक्षित होईल.”
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्ये ज्या प्रकारे सहकारी संस्थांमार्फत सैन्याला अन्नधान्य पुरवले जाते, तीच व्यवस्था उत्तराखंडमध्येही राबविण्यात येणार आहे.
स्थानिक विकासास चालना
या उपक्रमामुळे सीमावर्ती भागांतील सहकारी संस्थांना आर्थिक बळ मिळेल. दूध, पशुपालन आणि ताज्या रेशनचा पुरवठा स्थानिक पातळीवरून होणार असल्याने अन्नधान्याचा नियमित आणि सुलभ पुरवठा सुनिश्चित होईल.
चौहान म्हणाले की, “या योजनेंतर्गत सैन्य आणि स्थानिक समाज यांच्यातील सहकार्य अधिक बळकट होईल, तसेच सीमावर्ती भागांचा सर्वांगीण विकास साधता येईल.”





