जैसलमेर (राजस्थान) – राजस्थानमधील जैसलमेर-जोधपूर महामार्गावर थैयत गावाजवळ मंगळवारी (१४ ऑक्टोबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास एका चालत्या एसी स्लीपर बसला भीषण आग लागली. या दुर्घटनेत २० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून १६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बसमध्ये आग लागल्यानंतर काही क्षणांतच ज्वाळांनी संपूर्ण वाहनाला विळखा घातला. जीव वाचवण्यासाठी काही प्रवाशांनी चालत्या बसमधून उड्या मारल्या, तर काहींना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. बसमध्ये एकूण ५७ प्रवासी होते, त्यापैकी दोन मुले आणि चार महिलांसह १६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना प्रथम जैसलमेरच्या जवाहर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांपैकी गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी जोधपूरला हलवण्यात आले आहे. काहींवर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जैसलमेरचे जिल्हाधिकारी प्रताप सिंह यांनी सांगितले की, “आग इतकी भीषण होती की बस पूर्णपणे जळून खाक झाली. घटनास्थळी फक्त जळालेले अवशेष आणि मृतदेह शिल्लक राहिले आहेत.” मृतांची ओळख पटवण्यासाठी जोधपूरहून फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे.
या भीषण अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी प्रत्येक मृत प्रवाशाच्या कुटुंबाला २ लाख रुपये मदत आणि जखमींना ५०,००० रुपयांची आर्थिक सहाय्य जाहीर केली आहे.





