पहुर – दिवाळी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पहुर शहरात राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अतिक्रमणांवर प्रशासनाने कारवाईचा हातोडा चालवला आहे. या कारवाईमुळे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आला असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजेपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जालना विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी गेल्या पंधरवड्यापूर्वीच अतिक्रमणधारकांना नोटिसा दिल्या होत्या.
अतिक्रमणधारकांनी दसरा-दिवाळी सणासुदीच्या दिवसांत उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून कारवाई सणानंतर करावी, अशी विनंती केली होती. मात्र प्रशासनाने ही मागणी फेटाळून लावत आज प्रत्यक्ष कारवाई सुरू केली.
बुलडोजरच्या सहाय्याने महामार्गालगतची दुकाने, शेड्स आणि लहान व्यावसायिकांची साधने हटवण्यात आली. या कारवाईमुळे अनेक लहान व्यावसायिक आणि हातावरचे पोट असलेल्या कुटुंबांचा रोजगार गमावला आहे. नागरिकांनी संताप व्यक्त करत म्हटले, “हातोडा अतिक्रमणावर चालला की आमच्या रोजगारावर?”
प्रशासनाकडून मात्र असा दावा करण्यात आला आहे की, “महामार्ग सुरक्षित आणि वाहतुकीसाठी मोकळा ठेवणे अत्यावश्यक असून, वारंवार नोटिसा दिल्यानंतरही अतिक्रमण न हटवल्याने कारवाई अपरिहार्य होती.”





