जळगाव – जळगावसह देशभरातील बुलियन मार्केटमध्ये मंगळवारी (१४ ऑक्टोबर) चांदीच्या किमतींनी ऐतिहासिक झेप घेतली आहे. एका दिवसात तब्बल १५,००० रुपयांची उसळी घेत चांदीचा भाव प्रति किलो १,९५,००० रुपये या विक्रमी पातळीवर पोहोचला. त्याचवेळी, सोन्याच्याही किमती २,७०० रुपयांनी वाढून १,२७,४०० रुपये प्रति १० ग्रॅम झाल्या आहेत.
जागतिक तुटवड्याचा परिणाम
बाजार तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा पुरवठा कमी होत असून औद्योगिक वापर वाढल्याने मागणी आणि किंमत दोन्ही उच्चांकावर गेल्या आहेत. गेल्या पाच दिवसांत चांदीत तब्बल तीन मोठ्या वाढी नोंदल्या गेल्या आहेत. आता जीएसटीसह प्रति किलो चांदीचा दर २,००,८५० रुपये झाला आहे.
सोन्याचे दरही गगनाला भिडले
सोमवारी १,२४,७०० रुपये प्रति १० ग्रॅम असलेले सोने मंगळवारी २,७०० रुपयांनी वधारून १,२७,४०० रुपयांवर पोहोचले. जीएसटीसह एका तोळ्याचे दर आता १,३१,२२२ रुपये झाले आहेत. सणासुदीचा हंगाम जवळ येत असल्याने गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघेही या वाढीमुळे चिंतित झाले आहेत.
पुढील काही दिवस निर्णायक
विश्लेषकांच्या मते, आंतरराष्ट्रीय आर्थिक अस्थिरता, मध्य पूर्वेतील तणाव आणि डॉलरची घसरण यांचा परिणाम म्हणून मौल्यवान धातूंच्या किमतीत ही झपाट्याने वाढ होत आहे. येत्या काही दिवसांत सोन्या–चांदीच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





